तेहरान: मध्यपूर्वेत काही दिवसांपासून रणसंग्राम (Iran-US Conflict) सुरु आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यांनंतर इराणने प्रथमच चर्चेचे संकेत दिले आहेत. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक शब्दांत चर्चेचे निमंत्रण फेटाळून लावल्याने जगाची धाकधूक वाढली आहे.

गेल्या 47 वर्षांपासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणाऱ्या संघर्षाने आता उग्र रूप धारण केले आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनी इराणची कंबर तोडली आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्रालय आता चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत आहे. परंतु, ट्रम्प यांच्या मते, ही चर्चा शांततेसाठी नसून पूर्णपणे बचावासाठी आहे.
पाहा पोस्ट:
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत इराणला आरसा दाखवला आहे. “इराणला आता बोलायचे आहे, पण मी म्हणतो- खूप उशीर झालाय!” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांची ‘नो कॉम्प्रमाइज’ भूमिका आणि इराणची डळमळीत झालेली लष्करी ताकद पाहता, आगामी 48 तास या युद्धाची दिशा ठरवणारे असतील. आता इराण शरणागती पत्करणार की मित्र देशांची मदत घेऊन पुन्हा पलटवार करणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






