केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील अनेक गावांना सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे दोडका, गोसवळे, भोपळा, टॉमॅटो, वांगी, गिनी गवत, मका, कांदा अशी अनेक पिके भुईसपाट झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याचे चित्र केडगाव, खुटबाव, देलवडी, पिंपळगांव,राहु परिसरात दिसत आहे.
वातावरणात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. विजांचा कडकडाटासह दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे काढणीला आलेला गहू पिकांना तडाखा बसला. पावसाच्या माऱ्याने पिके जमीनदोस्त झाली. शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याच्या अरणीत काढून ठेवला. कांदा पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली.
दरम्यान, देलवडी येथील शेतकरी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब शितोळे म्हणाले, ”यंदा पिकांना चांगला बाजारभाव मिळेल, अशी आशा होती. परंतु आजच्या पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. आम्ही दीड एकर क्षेत्रावर दोडक्याचे पीक घेतले होते. त्यासाठी बियाणे, वेल बांधण्यासाठी तार, कळकाच्या काठ्या, मजुरी, औषधाची फवारणी, व ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचे नियोजन असा भरपूर आर्थिक खर्च केला होता. बाजारभाव चांगला मिळायला सुरुवात झाली होती, परंतु या वादळी वारे व पावसामुळे संपूर्ण दोडका पीक फुईसपाट झाले आहे. संपूर्ण फुले गळून पडली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसाभरपाईची द्यावी.
यावेळी युवा उद्योजक व शेतकरी चैतन्य वाघोले म्हणाले, शेतमालाला बाजारभाव नाही, त्यातच अवकाळी अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसाभरपाईची तरतूद करावी.
यावेळी देलवडी (दौंड) चे गावकामगार तलाठी दिपक अजबे म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालेले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्यास आम्ही संबंधित शेतकऱ्याचे पंचनामे करून पुढील कार्यालयास सादर करू.