पुणे : ताम्हिणी घाटात एक दुर्दैवी घटना घडली आहे. ताम्हिणी घाटातील मिल्की बार धबधबा येथे पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटकाचा मृत्यू झाल्याची ही एका महिन्यातील दुसरी घटना आहे. आदेश जितेंद्र पवार (वय-21 रा. वडगाव धायरी, पुणे मुळ रा. जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ताम्हिणी परिसरातील प्लस व्हॅलीमधील मिल्की बार धबधबा येथे तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग संघ, माणगाव आपत्ती व्यवस्थापन पथक, वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे तरुण, पोलीस आणि गिरीप्रेमी यांनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन केले.
मृत आदेश पवार हा नाशिकच्या आपल्या मित्रांबरोबर ताम्हिणी परिसरात पर्यटनासाठी गेला होता. धबधब्याला भरपूर पाणी आल्याने पोहताना अंदाज न आल्याने आदेशचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. खोल दरीमध्ये मृतदेह असल्याने बचावकार्यही अनेक तास सुरु राहिले. रात्रीच्या अकरा वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बचाव पथकांकडून देण्यात आली.
समाज माध्यमांवरील रील्स बघून ही मित्रमंडळी पर्यटनासाठी ताम्हिणी परिसरात आली होती. नागरिकांनी समाजमाध्यमांवरील आशय पाहून पर्य़टन करण्याचे धाडस करु नये. ताम्हिणी घाट आणि परिसरातील रस्ते निसरडे झाले असून स्थानिक किंवा परिसराची माहिती असणाऱ्या व्यक्ती सोबत घ्यावी, असे आवाहन बचाव पथकांकडून करण्यात आले आहे.
पावसाळा सुरु झाल्याने सगळीकडे निसर्गरम्य वातावरण तयार झाले आहे. धबधबे कोसळू लागले आहे. गड-किल्ले हिरवेगार झाले आहे. त्यामुळे अनेक पर्य़टक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, पर्य़टकांच्या अतिधाडसामुळे दुर्घटना घडत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही पर्यटक या धबधब्यात वर्षा सहलीसाठी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुरुवारी घडलेली दुसरी घटना घडली आहे.