मांडवगण फराटा (पुणे) : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे शाळकरी मुलीला भरधाव वाहनाने धडक दिल्यानी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनुष्का गणेश जगताप ( वय १३ ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. अनुष्का ही शाळेत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत होती. भरधाव कारने अनुष्काला धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगतापवाडी येथे २७ फेब्रुवारीला सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गणेश जगताप (रा. शिरसगाव काटा) यांनी मांडवगण फराटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतापवाडी येथील अनुष्का ही पिंपळसुटी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होती. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वडील तिला शाळेत जाण्यासाठी जगतापवाडी येथील एस.टी. थांब्यावर सोडून परत घरी गेले होते. यावेळी इनामगावकडून न्हावरे बाजूकडे जाणाऱ्या कारने (एमएच १२ जेएम ८३०६) तिला जोरदार धडक दिली.
या अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली. जखमी मुलीला स्थानिक नागरिक आणि मुलीच्या वडिलांनी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मांडवगण फराटा पोलिसांनी नंदकुमार संपत नलगे (रा. इनामगाव, ता. शिरूर) या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गवळी तपास करीत आहेत.