लोणी काळभोर : लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) परिसरात अनधिकृतरीत्या किटकनाशकांचा साठा करून विक्री होत असल्याचा पर्दाफाश करण्यात पुणे कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाला बुधवारी (ता. 24) बारा वाजण्याच्या सुमारास यश आले आहे. या कारवाईत पथकाने तब्बल 32 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल सील केला आहे. तर गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सचिन रामलिंग नलवडे (रा. लोणी स्टेशन,कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र रामचंद्र बारापत्रे (वय 57, रा. एफ 15, कोनार्क कॅम्पस, विमाननगर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र बारापत्रे हे पुणे कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकात तंत्र अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. बारापत्रे यांना शासनाकडून किटकनाशके निरीक्षक म्हणुन अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. नरेंद्र बारापत्रे यांना कदमवाकवस्ती (लोणी स्टेशन) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र 311 मधील एका इमारतीच्या गळ्यात में महादेश फार्म फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.धाराशिव यांचे एक उप कार्यालय आहे. आणि तेथून अनधिकृतरित्या किटकनाशके खरेदी विक्री व्यवसाय व साठा करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दक्षता पथकाने बुधवारी (ता.24) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा इमारतीचे पार्कीगमध्ये किटकनाशके आढळून आली. आरोपी सचिन नलवडे हा नोंदणी न करता किटकनाशकाची विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. तसेच किटकनाशके विक्री केलेल्या शेतकऱ्यांना विहीत नमुन्यातील खरेदी पावती न देवुन त्यांची फसवणूक केली आहे.
दरम्यान, पुणे कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथका सदर ठिकाणाहून 32 लाख 26 हजार रुपयांचा किटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. तसेच सर्व किटकनाशकांचे नमुने घेऊन मुंबई येथील किटकनाशके चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ही कामगिरी पुणे कृषी आयुक्तालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी गोविंद मोरे, कृषी उपसंचालक किरण जाधव, तंत्र अधिकारी सत्यवान नऱ्हे व हवेली पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुमित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
याप्रकरणी नरेंद्र बारापत्रे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन नलवडे याच्याविरोधात किटकनाशके कायदा 1968 कलम 3(के), 09, 18.27 व किटकनाशके नियम1971 नियम के06, 09, 10(1), 15, १८ सह भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 359 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी सचिन नलवडे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित घोडके करीत आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक हमुमंत तरटे, पोलीस हवालदार तेजस जगदाळे, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व शिवाजी दरेकर यांच्या पथकाने केली आहे.