लोणी काळभोर, ता. २२ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थेऊर फाटा (ता. हवेली) परिसरात कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि सुरक्षेची उपाययोजना न करता खोदकाम करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा प्रकार शनिवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला चारी खोदून त्यातील मातीचे ढिग थेट महामार्गावर टाकल्याने वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी जेसीबी चालक, मालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जेसीबी चालक विनोद सुभाष चव्हाण (रा. खटाटे वस्ती, कुंजीरवाडी), जेसीबी मालक मोहनिल उर्फ सनी सुनील खटाटे आणि संबंधित कामाचा ठेकेदार एम.डी. काझी खान (मूळ रा. बिहार, सध्या कुंजीरवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार बापू शंकर वाघमोडे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथील थेऊर फाटा परिसरात पुणे ते सोलापूर महामार्गावर जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, या कामासाठी संबंधित विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. तसेच खोदकामाच्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेटिंग किंवा सुरक्षेची साधने नसल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. याशिवाय, खोदलेल्या चारीतील माती थेट रस्त्यावर टाकण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

पोलिसांनी चौकशी केली असता, जेसीबी चालक विनोद चव्हाण, जेसीबी मालक मोहनिल उर्फ सनी खटाटे आणि संबंधित कामाचा ठेकेदार एम.डी. काझी खान (मूळ रा. बिहार, सध्या कुंजीरवाडी) यांची नावे समोर आली. या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
दरम्यान, भरधाव वाहतूक सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता सुरू असलेल्या खोदकामामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कारवाई केल्याने संभाव्य दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय महामार्गांवर अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या कामांवर संबंधित विभाग आणि प्रशासनाने अधिक कडक नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.







