तेलंगणा: तेलंगणातील रामचंद्रपुरम परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरामध्ये ६६ वर्षीय पुजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पुजाऱ्याचे नाव सयन्ना उर्फ सैलू (वय ६६ वर्षे) असे आहे. आरोपीने मंदिराला आतून कुलूप लावून एका अल्पवयीन मुलीवर हे अमानुष कृत्य केले. स्थानिक नागरिकांना संशय आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मंदिर उघडले आणि या घृणास्पद प्रकाराचा पर्दाफाश केला. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला असून, तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.


घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधम पुजारी सयन्ना उर्फ सैलू याला आपल्या ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून, दोषी पुजाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. धार्मिक स्थळासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.







