आदित्य बोराटे

इंदापूर : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील श्री विघ्नहर्ता मेडिकलसमोरून चोरीस गेलेल्या दुचाकीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे.चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करण्यासह आणखी दोन मोटारसायकली आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे . या कारवाईत तब्बल 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चार आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी तीन आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 604/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकाला दुचाकी चोरीबाबत गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर केलेल्या कारवाईत हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी, अंदाजे 30 हजार रुपये किमतीची, हस्तगत करण्यात आली. तपास पुढे नेताना पोलिसांनी आणखी दोन मोटारसायकली तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त केली.या कारवाईत एकूण चार आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी तीन आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इंदापूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे संबंधित दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बाळासाहेब कारंडे, सहायक पोलिस फौजदार शिवाजी निकम, पोलिस हवालदार किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, सुलतान डांगे, पोपट नाळे, सचिन होळकर, पोलिस अंमलदार गणेश डेरे, रहिस मुलाणी, तुषार चव्हाण यांनी केली.







