लोणी काळभोर : “विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या, तर श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना यंदाच सुरू झाला असता. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे अडथळे आणू नयेत,” असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केले.

श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा सोरतापवाडी परिसरातील कला गोविंद लॉन्स येथे रविवारी (ता. 27) झाली. या सभेत कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीसह नवीन अत्याधुनिक साखर प्लांट उभारणे, जुन्या प्लांटबाबत धोरण निश्चित करणे, जमीन विक्री-खरेदी, थकीत ऊस बिले तसेच कामगारांच्या थकीत देणी यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.

यावेळी बोलताना जगताप यांनी विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेला सहकार्य मिळणे गरजेचे असून, शेतकरी आणि कामगारांच्या हिताचा विचार करून सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, “अती घाई करून संकटात जाऊ नका. तुमच्या कामाला कोणीही अडचण आणत नाही. सर्व आवश्यक परवानग्या घेऊन कारखाना सुरू करा. आम्हालाही कारखाना सुरू व्हावा, असे मनापासून वाटते,” अशी भूमिका प्रशांत काळभोर यांनी मांडली. जमीन विक्री करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. चुकीचे निर्णय घेतल्यामुळे जमीन विक्री-खरेदी प्रक्रियेला मंत्रिमंडळाकडून अडथळे येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सभेत कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरूनही जोरदार चर्चा झाली. कामगारांनी थकीत वेतन व इतर देणी देण्याची मागणी केली, तर सभासदांनी सन 2010 पासून प्रलंबित असलेली ऊस बिले व्याजासहित देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सभेपुढे नवीन अत्याधुनिक साखर प्लांट उभारणीबाबत धोरण निश्चित करणे व संचालक मंडळाला अधिकार देणे, जुन्या कारखाना प्लांटबाबत धोरण ठरविणे, थकीत ऊस बिलांबाबत चर्चा, कामगारांची जुलै 2011 ते ऑगस्ट 2018 या कालावधीतील थकीत वेतन व इतर देणी, तसेच कारखान्याच्या स्टोअरमधील अस्तित्वात नसलेला माल व खराब साखर निर्लेखित करण्यास मान्यता आदी विषय होते. सभेतील विविध विषयांवर चर्चा आणि गोंधळाचे वातावरण असतानाही सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले,
यावेळी कारखान्याच्या उपाध्यक्ष रत्नाबाई काळभोर, संचालक किशोर उंद्रे, मोरेश्वर काळे, संतोष कांचन, योगेश काळभोर, हेमा काळभोर, कार्यकारी संचालक कैलास जरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तसेच प्रताप गायकवाड, रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, शशिकांत गायकवाड, बाळा आप्पा चौधरी, साधना सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष आप्पा काळभोर, लोणी काळभोरचे माजी सरपंच नागेश काळभोर, रमेश भोसले, बाळासाहेब जयवंत काळभोर, अलंकार कांचन, प्रताप बोरकर, राजेंद्र चौधरी, राजाराम कांचन, विकास लवांडे, भरत काळभोर, राहुल काळभोर आदी उपस्थित होते.






