पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत नवी मुंबई, सांगोला आणि बुलढाणा येथून आणखी चार जणांना अटक केली आहे.त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.तसेच अटकेतील दोघेजण टॉपर असल्याच समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये साजिद संदे (152.50 गुण – तिसरा क्रमांक) आणि विजय किंगर (156 गुण – चौथा क्रमांक) या दोन अव्वल उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी सातवा क्रमांक मिळवणाऱ्या ऋतुजा पाटील (155 गुण) हिला देखील ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे, या उमेदवारांनी इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी सामान्य कामगिरी केली असताना या परीक्षेत मात्र अचानक उच्च गुण मिळवले होते. या शंकास्पद कामगिरीमुळेच हा गैरव्यवहार उघडकीस आला.

या घोटाळ्यात उमेदवारांना प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या दोन मध्यस्थांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपी संदीप खलाटे हा विक्रीकर निरीक्षक असून भैरवनाथ कदम हा भारतीय नौदलात सिव्हिल टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. MPSC चे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांनी या मध्यस्थांच्या मदतीने प्रश्नपत्रिका लीक केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी MPSC मधील अधिकारी, कौटिल्य अकॅडमीचा संचालक आणि इतर मध्यस्थ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

अन्न व औषध प्रशासनातील 154 औषध निरीक्षक (गट-ब) पदांसाठी 22 मार्च 2026 रोजी राज्यातील 6 केंद्रांवर परीक्षा पार पडली होती. 22 जुलै रोजी जाहीर झालेल्या अंतरिम गुणवत्ता यादीत शासकीय पदाचा गैरवापर करून आर्थिक फायद्यासाठी गोपनीयतेचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण प्रकरणी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम 2024 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून SIT कडून पुढील तपास सुरू आहे.







