सासवड, ता. 06 : दहीहंडीच्या उत्साहात पुण्याकडे निघालेल्या बारामतीतील तीन तरुणांवर दिवे घाटात काळाने घाला घातला. दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावर घसरल्यानंतर तिघेही खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली एक तरुण आल्याने गौरव चव्हाण (वय -18, रा. आमराई, बारामती) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीच्या आमराई परिसरातील तीन तरुण दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. दिवे घाटातून जात असताना दुचाकीवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरली आणि तिघेही खाली पडले.

दुचाकी घसरल्यानंतर काही क्षणांतच मागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये गौरव चव्हाण वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दहीहंडीचा उत्साह साजरा करण्यासाठी पुण्याकडे निघालेल्या तरुणांवर झालेल्या या दुर्घटनेने बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना दुचाकीचा वेग नियंत्रणात ठेवणे, हेल्मेटचा वापर करणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरातही दहीहंडी उत्सवादरम्यान मृत्यूची घटना समोर आल्याने यंदाच्या उत्सवाला अपघातांचे गालबोट लागले आहे.







