प्रदिप रासकर
निमगाव भोगी : रांजणगाव कारेगाव येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एंव्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनीसमोर आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी निमगाव भोगी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले. यावेळी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वतीने आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गुरुवार (दि १०) ऑक्टोबर रोजी भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाची सांगता केली. तर आज शुक्रवार (दि ११) ऑक्टोबर रोजी निमगाव भोगी, सरदवाडी, कर्डेलवाडी, आमदाबाद तसेच परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले व महिला भगिनींसह दिवसभर कंपनीच्या गेट समोर भजन गाऊन आगळे वेगळे आंदोलन केले. यावेळी ‘MEPL कंपनी हटाव गाव बचाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला अंकुश इचके, उपसरपंच विकास रासकर, माजी उपसरपंच सिंधूताई रासकर,सचिन सांबारे, लक्ष्मण सांबारे, डॉ संतोष शिंदे,केशव शिंदे,आमदाबाद गावचे माजी सरपंच प्रकाश थोरात, नितीन थोरात, कर्डेलवाडीचे माजी सरपंच संतोष कर्डिले, गणेश कर्डिले, निमगाव भोगीच्या माजी सरपंच सुप्रिया पावशे, चांगदेव रासकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.