पुणे : पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. पौड तालुक्यात तुकोबा आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाच्या सेवेचा मानकरी ठरलेल्या बैलाला भरधाव वेगाने येणार्या सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री घडली. चालकाच्या वाहनाचा ताबा सुटल्याने थेट बैलाला धडक दिल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मालकाने जिवापाड जपलेल्या बैलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने मालकाने हंबरडा फोडला होता. या बैलाच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील पौड तालुक्यातील भूकुम गावात सायंकाळी हा अपघात झाला आहे. मोती नावाच्या बैलाला संत तुकाराम महाराजांच्या आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाची सेवा करण्याचा मान मिळाला होता. भविष्यात पुन्हा एकदा हा मान मिळवण्यासाठी मोतीकडून सराव करून घेतला जात होता. सोमवारी सायंकाळीही सराव सुरू होता.
त्यावेळी चांदणी चौकाकडून पौडच्या दिशेने सिमेंट मिक्सर निघाले होते. मात्र अचानक चालकाचा ताबा सुटला अन् पुढे निघालेल्या बैलगाडीला त्याने जोराची धडक दिली. या धडकेत मोतीचा जागीच मृत्यू झाला. बैलाच्या मृत्यूची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळं भुकुम गावासह वारकरी संप्रदाय आणि गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पालखीच्या सोहळ्यासाठी बैलाची निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता यांची पाहणी करून या निकषांनुसार बैल जोडी निवडली जाते. पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात येत असतात. बैलजोडी मालकांच्या बैलजोडीला पालखी रथाला ओढण्याची सेवा करण्याची संधी मिळावी ही अनेकांची इच्छा असते. मात्र मानाच्या बैलाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.