पुणे: तरुणाईचा मोठा वेळ सध्या सोशल मीडियावर जात आहे. रील्स, फॉरवर्ड मेसेज आणि लाइक्सच्या जगात अडकताना आपल्या आसपासच्या वास्तवाकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी 22 ऑगस्ट रोजी दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने मुंढे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार मयूरेश कोण्णुर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी समाजमाध्यमांचा मानसिकता आणि सामाजिक नात्यांवर होणारा परिणाम यावर त्यांनी आपले मत मांडले.

मुंढे यांच्या मते, सोशल मीडिया हेच खरे जग असल्यासारखे अनेक जण वागू लागले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मतांचा विचार करण्याची सवय कमी होत आहे. कोणत्याही विषयाची दुसरी बाजू समजून न घेतल्याने समाजात मतभेद वाढत आहेत. संवादासाठी अनेक साधने उपलब्ध असूनही प्रत्यक्ष आणि मनापासून होणारा संवाद कमी झाल्याने नात्यांमधील जवळीकही कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कार्यक्रमस्थळाबाहेरील खाऊ गल्लीही चर्चेचा विषय ठरली. मुंढे कार्यक्रमाला येणार असल्याने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील काही खाद्यविक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
आपल्या कामाच्या पद्धतीबाबत बोलताना मुंढे यांनी आपला वेग अधिक असल्याचे सांगितले. एखाद्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारल्यानंतर कायदे, अधिकारी आणि नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन सुरुवातीपासून काम करण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अॅनालॉग पनीरप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानेही एफडीएच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. ठाण्यातील एका रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. ग्राहकांना ते नेमके कोणते खाद्यपदार्थ खात आहेत, याची स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
एफडीएने राज्यात अॅनालॉग किंवा दुग्धजन्य नसलेल्या पनीरवर बंदी घातल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये पारदर्शकता आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.







