पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात शेतात गाई चारण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय महिलेवर अज्ञात चोरट्याने तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या अंगावरील सुमारे 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाला. या घटनेमुळे गोरे वस्ती परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील गोरे वस्ती परिसरातील शेतात घडली. याप्रकरणी दीपक गोरे (वय 46, रा. गोरे वस्ती, वाघोली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाघोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गोरे यांच्या आई नेहमीप्रमाणे सायंकाळी शेतात गाई चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेतात कोणीही नसल्याची संधी साधून एका चोरट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्या अंगावर वार केले. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या.

त्यानंतर चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील कर्णफुले असा सुमारे 90 हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पसार झाला.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत महिलेने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
शेतात एकट्या असलेल्या ज्येष्ठ महिलेवर हल्ला करून दागिने लुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीने आधीपासून महिलेवर पाळत ठेवली होती का, हल्ल्याच्या वेळी त्याच्यासोबत आणखी कोणी होते का, तसेच परिसरातील सीसीटीव्ही किंवा इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढता येतो का, याचा तपास पोलीस करत आहेत.







