इंदापूर, (पुणे) : मैत्रीवर विश्वास ठेवून वापरण्यासाठी दिलेली तब्बल 17 लाख रुपयांची क्रेटा कार परत मिळत नसल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेतली आहे. कार परत मागितल्यानंतर टाळाटाळ करण्यात आली, तसेच चौकात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. ही घटना सुरवड (ता. इंदापूर) येथे घडली. या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर साहेबराव काळोखे (वय 31, रा. सुरवड, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मयूर धनाजी घोगरे (रा. सदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मित्राचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे 2026 ला काळोखे यांनी एमएच 42 बी.डब्ल्यू 3065 क्रमांकाची क्रेटा कार फायनान्सवर खरेदी केली होती. कारची किंमत 17 लाख रुपये असून, चार लाख रुपये डाउन पेमेंट आणि दरमहा 26 हजार 57 रुपयांचा हप्ता आहे. कार खरेदी केल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी गावातील परिचित मित्र मयूर घोगरे याने काही दिवस वापरण्यासाठी कार मागितली. त्यानुसार 30 मे 2026 रोजी दुपारी एक वाजता काळोखे यांनी विश्वासाने कार त्याच्याकडे दिली. मात्र, जून महिन्यात कार परत मागितल्यानंतर मयूर याने बाहेरगावी असल्याचे सांगून टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने मयूरच्या घरी जाऊन त्याच्या आईकडे कार परत करण्याची मागणी केली. मयूर दोन महिन्यांपासून घरी आला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, मयूरने मित्र निखिल जाधव याच्या फोनवरून संपर्क साधत, कार मागितल्यास चौकात आल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप काळोखे यांनी केला आहे. कार मिळत नसतानाही त्यांनी तिचे सहा मासिक हप्ते भरल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी काळोखे यांनी 20 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर 2026 रोजी बावडा पोलीस चौकी तसेच इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले होते. चौकशीसाठी बोलावूनही मयूर वारंवार गैरहजर राहिल्याचा, तसेच कारसंदर्भातील कागदपत्रे आणण्याचे सांगून निघून गेल्यानंतर परत न आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दरम्यान, आपली 17 लाख रुपयांची कार परत मिळत नसल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे काळोखे यांनी तक्रारीत म्हटले आहे. विश्वासाने दिलेली कार परत न केल्याप्रकरणी मयूर धनाजी घोगरे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि कारचा ठावठिकाणा पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.






