लोणी काळभोर, ता. 13 : घटस्फोटानंतर माजी पत्नीच्या जुन्या फेसबुक खात्याचा गैरवापर करून तिचा आणि तिच्या मित्राचा वैयक्तिक फोटो फेसबुकवर अपलोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) परिसरात घडली असून एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000- 66(C),66(ड) ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 356(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित उदय देशमुख (रा. थेऊर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे सोशल मीडिया, नातेवाईक आणि समाजात आपली बदनामी झाल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला आणि आरोपी अभिजित देशमुख यांचा विवाह सन 2023 मध्ये याच्याशी झाला होता. मात्र, कौटुंबिक वादामुळे दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला. त्यानंतर त्या आपल्या आई-वडिलांकडे राहू लागल्या.

दरम्यान, फिर्यादी यांना त्यांच्या मित्रामार्फत जुन्या फेसबुक खात्यावर त्यांचा आणि मित्राचा एकत्रित फोटो अपलोड केल्याची माहिती 17 ऑगस्ट 2026 रोजी मिळाली. संबंधित फेसबुक खात्याचा पासवर्ड माजी पती अभिजित देशमुख याच्याकडे असल्याने, त्यानेच या खात्याचा गैरवापर केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी त्यांनी 29 ऑगस्ट रोजी सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर सायबर पोलिसांनी फेसबुक खाते आणि संबंधित तांत्रिक माहितीची चौकशी केली. या चौकशीत काही मोबाइल क्रमांक समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर 12 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांनी माजी पती अभिजित देशमुख याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली. सोशल मीडियावरील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून बदनामी केल्याचा आरोप या प्रकरणातून समोर आला असून, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.







