पुणे : पेट्रोल पंपाच्या व्यवसायात अर्धी भागीदारी आणि चांगला आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून 69 वर्षीय ज्येष्ठ व्यावसायिकाची 2 कोटी 47 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकाने स्वतःचे घर गहाण ठेवले आणि सोन्याचे दागिनेही विकले. मात्र, काही काळ परतावा दिल्यानंतर संबंधितांनी पैसे देणे बंद केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हडपसरमधील काळेपडळ पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल पंपातील भागीदारीचे दाखवले आमिष
मोहन दगडू मोरे (वय 69, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आनंद मदनलाल लाहोटी आणि कालिदास विजय मगर अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
तक्रारीनुसार, दोघांनी सय्यदनगर (हडपसर) आणि वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ‘मगर फ्यूल स्टेशन’ या पेट्रोल पंपांमध्ये आपली भागीदारी असल्याचे मोरे यांना सांगितले. या व्यवसायात 50 टक्के हिस्सा मिळवून देण्याचे आणि गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून मोरे यांनी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

घर गहाण ठेवून जमवले कोट्यवधी रुपये
गुंतवणुकीसाठी मोरे यांनी आपले घर गहाण ठेवले. तसेच, घरातील सोन्याचे दागिने विकून मिळालेली रक्कमही व्यवसायात गुंतवली. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने त्यांनी एकूण 2 कोटी 47 लाख 15 हजार रुपये संबंधित व्यक्तींच्या आणि पेट्रोल पंपाच्या खात्यांमध्ये जमा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सुरुवातीला परतावा, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ
गुंतवणूकदाराचा विश्वास कायम राहावा यासाठी सुरुवातीच्या काही महिन्यांत नफ्याच्या स्वरूपात ठराविक रक्कम परत देण्यात आली. मात्र, त्यानंतर मूळ गुंतवणूक आणि नफ्याची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याचा आरोप आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोरे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करीत आहेत.







