पुणे : कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत एका तरुणाने वाघोली येथे मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या तीन मजली इमारतीवरील टॉवरवर चढलेल्या या तरुणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. तब्बल तीन तास सुरू असलेल्या या प्रकारानंतर पोलिस आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवले.

रोशन कुमार (वय २७, रा. कात्रज, मूळ बिहार) असे या तरुणाचे नाव आहे. तो खासगी जीपचालक म्हणून काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, घरातील व्यक्तींशी झालेल्या वादानंतर तो दुचाकीवरून गावाकडे निघाला होता. मात्र, वाघोली परिसरात पोहोचल्यानंतर त्याचे पुन्हा कुटुंबीयांशी बोलणे झाले. या वेळी वाद आणखी वाढल्याने तो मानसिक तणावात गेला. त्यानंतर त्याने मद्यप्राशन केले आणि महामार्गालगतच्या इमारतीवरील मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला.

टॉवरवर चढल्यानंतर तरुणाने खाली उडी मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र, तो पोलिसांचे ऐकण्यास तयार नव्हता. बराच वेळ तो टॉवरवरून उडी मारण्याची धमकी देत राहिला. मद्यधुंद अवस्थेत असलेला हा तरुण अखेर टॉवरवरच झोपी गेल्याने परिस्थिती अधिकच विचित्र बनली.

या घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान, पोलिस आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी काळजीपूर्वक टॉवरवर चढून तरुणाला सुरक्षितपणे खाली आणले. सुमारे तीन तास चाललेल्या या थराराचा अखेर शेवट झाला. या घटनेमुळे वाघोली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.






