लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यु टर्न घेताना ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्वामी समर्थ मंदिराच्या समोर शनिवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी होऊन कंटेनरमध्ये अडकला होता. कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवून चालकाला नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले.
अमोल श्रीपदी गावडे (वय-२९, रा. सांगोला, जि. सोलापूर) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्यावर लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे. तर या घटनेदरम्यान सचिन तुपे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे अमोलचे प्राण वाचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गावडे हा कंटेनर चालक असून तो मुंबईहून हैद्राबादकडे माल वाहतूक करत असतो, दरम्यान, गावडे हा पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने शनिवारी पहाटे चालला होता. तेव्हा कुंजीरवाडीतील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ एक ट्रक यु टर्न घेत होता. अमोल गावडे याचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि यु टर्न घेणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.
या अपघातात अमोल गावडे हा गंभीर जखमी होऊन कंटेनर मध्ये अडकला होता. अपघात झाला तेव्हा खूप मोठा आवाज आला. हा आवाज ऐकून कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तुपे यांनी तत्काळ अमोल गावडे यांना नागरिकांच्या मदतीने कंटेनरमधून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमीला लोणी काळभोर येथील एका मोठ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अद्यापही कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला नसला तरी पुढील तपास पोलीस करीत आहे.
सचिन तुपे याचं होतेय सर्वत्र कौतुक
अपघाताच्या ठिकाणी मदत करण्याऐवजी बघ्यांची मोठी गर्दी असते. तसेच आपल्याला याचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे निघून जातात. मात्र आपण समाजाचे काहीतरी देणे आहे. या भावनेतून कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमीला सुखरूप गाडीतून बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिका बोलावून घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सचिन तुपे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे चालकाचे प्राण वाचले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.