उरुळी कांचन, ता. 21 : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत हॉटेलसमोर गाडी पार्क करून खाली उतरत असलेल्या 53 वर्षीय व्यक्तीला ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात व्यक्तीच्या उजव्या खांद्याला जोरदार धडक बसून ते खाली पडले आणि ट्रॉलीचे चाक त्यांच्या उजव्या पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली. मारुती काशीनाथ दगडे (वय -53, रा. बावधन, ता. मुळशी, जि. पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकट गोविंद सावंत हे पत्नी, मुलांसह भुगाव येथे राहतात. शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी ते आपल्या पत्नी, मुलगा आणि सासरे मारुती दगडे यांच्यासह मारुती सुझुकी सियाझ कारने नांदेड जिल्ह्यातील आंबेसांगवी येथे त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील एका हॉटेलसमोर ते जेवणासाठी थांबले. गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केल्यानंतर मारुती दगडे हे गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर भरधाव वेगाने आला.

ट्रॅक्टर क्रमांक MH-12-EB-4034 असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ट्रॅक्टरच्या मागील ऊसाने भरलेल्या ट्रॉलीची दगडे यांच्या उजव्या खांद्याला जोरदार धडक बसली. त्यानंतर ते खाली पडताच ट्रॉलीचे चाक त्यांच्या उजव्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमी मारुती दगडे यांना कोणतीही वैद्यकीय मदत न करता तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न देता ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमींना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणी व्यंकट सावंत यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 242/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 281,125 (ई) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार निलेश जाधव करीत आहेत.







