लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कधी ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसून येतात. तर कधी उरुळी कांचन व हडपसर-१५ नंबर येथील वाहतूक कोंडीत तासनतास अडकून नागरिकांसह चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्यांचा नागरिक सामना करीत आहेत. आता कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्तीच्या परिसरात एक वाळलेले झाड महामार्गावर लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. महामार्गावरून येजा करणाऱ्या नागरिकांना धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या महामार्गाला समस्यांचे ग्रहण लागले का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
हडपसर ते कवडीपाट टोलनाका यादरम्यानच्या पाच किलोमीटर अंतराचे सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून डांबरीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू असतानाच पाठीमागे डांबरीकरण उखडले जात आहे. रस्त्यावरील खड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले असून लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांडून शंका व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडीत गुदमरतोय जीव
हडपसर गाव ते पंधरा नंबर या दरम्यान रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत खाजगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे पुण्याहून उरुळी कांचनकडे जाणाऱ्या बाजूच्या लेनवर दररोज वाहतूक कोंडी होते. लग्नसराई, दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टी या काळात तर रस्त्यात थांबलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे दोन-दोन तास वाहतूक ठप्प होते. या वाहतूक कोंडीत नागरिकांचा जीव गुदमरत आहे.
उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी जटील
उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत चाललेला आहे. येथील एलाईट चौक व तळवाडी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा नागरिकांसह येथून जाणारे मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांनाही मोठा फटका बसला आहे. बेशिस्त वाहनचालक, अवैध प्रवासी वाहतूक व वाहतूक पोलिसांची कमतरता यामुळे अपघात व कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार
महामार्गावरील वाळलेले झाड हे कोणत्याही क्षणी पडू शकते? यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथून प्रवास करताना नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार लटकत आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अद्यापही जाग आलेली नाही. झाड धोकादायकरित्या लटकलेल्या अवस्थेत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणा-या प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
झाड महामार्गावर पडले तर एखादी दुर्घटना घडू शकते? दुर्घटना घडण्याच्या आगोदरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे झाड त्वरित हटवावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.