पुणे : इंदापूर तालुक्यातुन एक थरारक घटना समोर येत आहे. जेवण नाकारल्याच्या रागातून एका मद्यधुंद चालकाने त्याचा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवल्याची घटना इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली आहे. त्या चालकाने आधी हॉटेल समोरील दोन चारचाकी गाड्यांना कंटेनरची धडक देत त्याचा चुराडा केला आणि नंतर हॉटेलचेही मोठे नुकसान केले. या प्रकरणी कंटेनर चालकाला तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या इंदापूरमध्ये मद्यधुंद कंटेनर चालकाचा धिंगाणा बघायला मिळाला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापुरातील हिंगणगांव येथे रोड लगत असणाऱ्या हॉटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातून एका मद्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवत एक स्कुटी, एका कारसह हॉटेलचे नुकसान केलं आहे.
जेवण नाकारल्याच्या रागातून राडा..
सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने MH 12 RN 4359 क्रमांकाचा हा कंटेनर घेऊन चालक निघाला होता. दरम्यान हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळ वरती चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हॉटेल मध्ये जाऊन जेवण मागितलं. परंतु, हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर कंटेनर चालकाने हॉटेलच्या बाहेर एक राऊंड मारत समोर असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली.
त्यानंतर लोकांनी त्या कंटेनर चालकाला गाडी थांबवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर गाडीचालकाने गाडी थांबवली. नंतर लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी मोठी गर्दी असते. अशात ही घटना घडली. परंतु सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.