बारामती : बारामती तालुक्यातील लिमटेक गावातील किराणा दुकान हार्डवेअर दुकानाच्या दरवाजे फोडून चोरट्यांनी घरफोडी केली असल्याची घटना घडली आहे. परंतु, यामध्ये तानाजी माणिकराव जाचक यांच्या घरातून सर्वात मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. तब्बल साडेनऊ तोळे जुने सोन्याचे दागिने व एक किलो चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत.
या चोरीच्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून याप्रकरणी बारामती शहर पोलिसांकडे तानाजी माणिकराव जाचक यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या रात्री नऊ वाजल्यापासून ते 21 सप्टेंबर 2024 च्या पहाटे तीन वाजेपर्यंतच्या काळात या चोऱ्या झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये जाचक यांच्या शेजारी राहणारे चेतन बनसोडे यांचे किराणा दुकानाचे व विक्रांत मालोजीराव जाचक(वय 70 वर्ष) यांच्या हार्डवेअर दुकानाचे दरवाजे तोडून आत प्रवेश करून घरफोडी करण्यात आली, तर तानाजी जाचक यांच्या घरात शिरून चोरट्यांनी तब्बल साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने व एक किलो वजनाचे चांदीची भांडी चोरून नेली आहेत.
21 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान जाचक यांच्या आई शारदाबाई झोपेतून उठल्यानंतर त्यांना घरातील कपाट उघडे असल्याचे दिसले आणि दरवाजाही उघडा असल्याचे दिसल्याने त्यांनी जाचक यांना बोलावून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान बारामती शहर पोलिसांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार मस्कर करत आहेत.