हडपसर, ता. ११ : काळेपडळ परिसरात कुटुंबीयांसोबत रात्री वॉकिंगसाठी गेलेल्या एका शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या दोन साखळ्या हिसकावण्याचा प्रकार बुधवारी (ता. १०) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. महिलेनं प्रतिकार केल्याने चोरट्यासोबत झटापट झाली. मात्र, साखळ्यांचा अर्धा भाग तुटून चोरट्याच्या हाती लागल्याने तो भरधाव वेगाने पसार झाला. या घटनेत सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

याप्रकरणी लिना अँडवर्ड मॅन्कीनी (वय ४६, रा. निर्मल टाउनशिप, काळेपडळ, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या व्यवसायाने शिक्षिका असून पती आणि मुलांसह काळेपडळ येथे वास्तव्यास आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री जेवण झाल्यानंतर लिना मॅन्कीनी या मुलगा जेकब, भावाची मुलगी पर्ल आणि आई डॉर्थी यांच्यासोबत वॉकिंगसाठी बाहेर पडल्या होत्या. निर्मल टाउनशिप परिसरातून समृद्धी हॉटेलपर्यंत फेरफटका मारून त्या परतत असताना रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास मोरया हॉस्पिटलसमोर अचानक काळा मास्क आणि काळी टोपी घातलेला एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळ आला.
काही समजण्याच्या आतच आरोपीने त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्यांना हिसका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, लिना मॅन्कीनी यांनी तत्काळ दोन्ही साखळ्या घट्ट पकडल्याने आरोपी आणि त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत दोन्ही साखळ्यांचा अर्धा भाग तुटून चोरट्याच्या हाती लागला, तर उर्वरित भाग महिलेच्या हातात राहिला. त्यानंतर आरोपी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून ससाणेनगरच्या दिशेने पसार झाला.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये प्रत्येकी सुमारे सहा ग्रॅम वजनाच्या आणि ४५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या साखळ्यांचा समावेश असून, एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
दरम्यान, आरोपीचे वय अंदाजे २२ ते २३ वर्षे असून त्याने काळ्या रंगाचा शर्ट, डार्क ग्रीन रंगाची पँट, काळा मास्क आणि काळी टोपी परिधान केली होती. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.







