लोणी काळभोर, ता. 7 : आईस्क्रिम पार्लरच्या दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांनी गल्ल्यातील 16 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील एमआयटी परिसरात घडली असून मंगळवारी (ता.7) सकाळी उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सत्यवान नवनाथ मुळे (वय 42 व्यवसाय – आईस्क्रिम पार्लर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळे यांचे एमआयटी कॉर्नर, खोले वस्ती येथील खोले यांच्या बिल्डिंगमध्ये आईस्क्रिम पार्लरचे दुकान असून ते कुटुंबासह तेथून उदरनिर्वाह करतात.

6 एप्रिल रोजी रात्री सुमारे 12 वाजता मुळे यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. मात्र, ७ एप्रिल रोजी पहाटे सुमारे अडीज वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या शुभम जगताप यांनी फोन करून दुकान फोडल्याची माहिती दिली. तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकावून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.
दुकानात तपासणी केली असता गल्ल्यातील सुमारे 16 हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. या रकमेमध्ये 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश होता. याच परिसरातील शेजारील ‘काका हलवाई’ दुकानाचेही शटर उचकावण्यात आले होते. मात्र, त्या दुकानातून कोणतीही रोकड किंवा साहित्य चोरीस गेले नसल्याची माहिती मिळाली आहे.
या सलग घटनांमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331 (4),305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







