पुणे: पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या नवले पुलाखाली पोलिसांनी अचानक धाड टाकून एका मोठ्या अवैध गुटखा विक्रीचा पर्दाफाश केला आहे. नऱ्हे पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे केलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नऱ्हे पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या कारवाईत एकूण १७,३४,००० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हबास मुबारक खान (वय ३४, रा. राजस्थान) आणि सोहेल अस्लम मुलाणी (वय २२, रा. पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार देवा रमेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऱ्हे पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

२१ जून रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास पोलिसांना नवले पुलाखाली प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक आणि विक्री केली जात असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता पुलाखाली सापळा रचला आणि धाड टाकली.
या अवैध पुरवठा साखळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधण्याचे आव्हान आता नऱ्हे पोलिसांसमोर आहे. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.







