राहुलकुमार अवचट
यवत : बोरीभडक येथील वसुधंरा मिल्क अँड ॲग्रो फुड्स या बंद पडलेल्या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे कोल्ड रूम युनिट आणि वजनकाटा असा एकुण १ लाख ८० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना ३० मे रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सोमनाथ उर्फ मोन्या जगन्नाथ मोरे (वय-२०), लक्ष्मण बबन सोनवणे (वय-२३, दोघेही रा. चंदनवाडी, बोरीभडक), गौरव शंकर दुर्गुडे (वय-२०, रा. खुडेवस्ती, डाळींब), मनोज उर्फ मन्या विलास सोनवणे (वय-१९ , रा चंदनवाडी, बोरीभडक), सुमित राजेंद्र नेटके (वय-२१ रा सहजपुर, म्हेत्रेवस्ती), दत्ता संतोष साळवी (वय-१९ ,रा. सहजपुर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरीभडक गावच्या हद्दीत वसुधंरा मिल्क अँड ॲग्रो फुड्स ही कंपनी आहे. या बंद पडलेल्या कंपनीत अज्ञात चोरट्यांनी कोल्ड रूम युनिट व वजनकाटा चोरून नेला. या प्रकरणाची माहिती यवत पोलिसांना मिळताच गुन्हे शोध पथकाने आरोपींचा शोध घेत सदरचा गुन्हा चंदनवाडी, बोरीभडक आणि सहजपुर परीसरातील आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून कोल्ड रूम युनिट आणि वनज काटा असा एकूण तब्बल १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, काही आरोपींना यवत पोलिसांनी काही दिवसापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ५ जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. तर अन्य तीन आरोपींना ३ जून रोजी अटक केली असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.