कुरकुंभ, (पुणे) : कुरकुंभ येथील एका तरुणाला लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अविनाश श्रीरंग साळुंखे (वय-३६, रा. कुरकुंभ) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रणीत राजेंद्र भागवत, सूरज राजू होले, रोहित महादेव होले, ओंकार नाना होले (तिघेही रा. गोपाळवाडी, ता. दौंड) आणि इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फिर्यादी तरुण अविनाश साळुंखे याला गावातीलच आरोपी प्रणीत भागवत याने फोन करून फिरंगाई क्रिकेट मैदान येथे बोलावून घेतले. त्यानंतर भागवत व सूरज होले, रोहित होले, ओंकार होले यांच्यासह आणखी तीन जणांनी कोणतेही कारण नसताना अविनाश साळुंखे याला लोखंडी सळईने डोक्यात, पायावर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत अविनाश साळुंखे जखमी झाला असून, त्याच्यावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मारहाण करणाऱ्या तरुणांनी साळुंखे यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व रोख रक्कम असा ६७ हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत