इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित अकरावीतील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राजवर्धन पाटील म्हणाले की,’ महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी जेव्हा इंदापूर तालुक्यातील भेटीदरम्यान भेटतात तेव्हा ते आपले चांगले अनुभव सांगतात त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
विद्यार्थ्यांनी देखील या संस्थेच्या योगदानाची प्रगती केलेल्या कार्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. आज तंत्रज्ञानामध्ये मोठे बदल होत आहेत. शिक्षणातून प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठे प्रयत्न करावेत. महाविद्यालयात अनेक सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक धोरणातून आपला सर्वांगीण विकास करण्याकरिता प्रयत्न करण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी महाविद्यालयातील उपक्रमाची माहिती देत बारावीतील विद्यार्थ्यांनी अकरावीतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे तसेच सहकारी शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.
विजेता देवकुळे, गीता भोसले , संचिता माने, प्राची जाधव, ज्ञानेश्वर गुरगुडे, दीक्षा कापसे या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रोहिदास भांगे यांनी केले तर आभार प्रा. सुनील सावंत यांनी मानले.