सागर जगदाळे
भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार उपसमिती भिगवणच्या मासळी लिलाव बाजारामध्ये आज (दि. २९) चिलापी या माशाने चांगलाच भाव खाल्लेला पाहायला मिळाला. साधारणपणे चिलापी जातीच्या माशाला जवळपास 185 रुपये इतका विक्रमी बाजारभाव मिळालेला आहे. माऊली नगरे यांच्या लिलाव काट्यावर 185 रुपये किलो प्रतिने चिलापी मासा विकला आहे. गेल्या महिनाभरापासून चिलापी माशाला चांगला भाव मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भिगवण परिसरात उजनी धरणाच्या पाण्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. भिगवणमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठा गोड्या माशाचा बाजार भरवला जातो. या ठिकाणाहून चिलापी हा मासा महाराष्ट्र राज्यासह बाहेरच्या राज्यातही पाठवला जातो. यामुळे या ठिकाणच्या माशांना चांगला बाजारभाव मिळतो. तसेच खवय्यांसाठी भिगवणचे चिलापी म्हणून प्रसिद्ध असल्याने या माशाला जास्त मागणी आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये चिलापी माशाचा पुरवठा कमी व मागणी जास्त असल्याने या माशाला उच्चांकी भाव मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून चिलापी माशाचा पुरवठा हा कमी अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे चिलापीला वाढीव भाव मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्या जरी चिलापीचे भाव तेजीत असले तरी हॉटेल व्यवसायिकांना मात्र चढ्या भावाने चिलापी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचा दररोजचा खर्च मात्र वाढत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
खवय्यांच्या खिशाला झळ
200 ग्रॅम 130 रु, 300 ते 400 ग्रॅम 140 ते 160, 500 ग्रॅम 170 ते 175 पर्यत चिलापीला बाजारभाव मिळत आहे. चवीला चांगला असल्यामूळे या माशाला मागणीही जास्त असते. परंतु सद्या बाजारभाव तेजीत असल्यामुळे मासे खवय्यांच्या खिशाला झळ पोहचत आहे.
गरिबांचा मेवा झाला महाग
चिलापीला गरिबांचा मेवा म्हटले जाते. कारण अवघ्या ४० ते ५० रुपये किलो दरामध्ये तो उपलब्ध होतो. ६०० ते ८०० रुपये किलोच्या सुरमई व पापलेटपेक्षा चिलापीवरच ताव मारलेला बरा, असे खवय्ये म्हणतात. अगदी मुंबईतील गरीब व मध्यमवर्गीय घटकांना तो परडवतो. परंतु सद्यस्थितीला चिलापीचे भाव तेजीत असल्यामुळे हा गरिबांचा मेवा मध्यमवर्गीय लोकांना खाण्यासाठी परवडत नाहीये.