पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्यंत अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निकाल गुरुवारी, २५ जून रोजी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात लागला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या खटल्याचा अंतिम निकाल देताना ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने या गुन्ह्याचे वर्णन ‘अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी’ असे केले असून, हा निकाल देताना न्यायाधीशांनी आरोपीच्या क्रूरतेवर कडक शब्दांत भाष्य केले.

निकाल वाचन करताना न्यायाधीश साळुंखे यांनी सांगितले की, आरोपीने अत्यंत शांत डोक्याने आणि विचारपूर्वक हे कृत्य केले होते. पीडित मुलगी अवघ्या तीन वर्षांची होती आणि ती स्वतःचे रक्षण करण्याच्या स्थितीत नव्हती. आरोपीने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले आणि तिच्यावर केवळ बलात्कारच केला नाही, तर तिला अकल्पनीय वेदना दिल्या. शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट झाले की, मुलीच्या शरीरावर १८ जखमा होत्या आणि तिचा श्वास कोंडण्यासाठी आरोपीने तिच्या तोंडात २१ सेंटीमीटर लांब कपडा कोंबला होता. न्यायाधीशांनी या कृत्याला राक्षसी म्हटले असून, मृत्यूनंतरही आरोपीने पीडितेच्या मृतदेहावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.

न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले की, आरोपीला आपल्या कृत्याची पूर्ण जाणीव होती आणि त्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती. यापूर्वीच्या गुन्हेगारी इतिहासाचा विचार करता, त्याला आपण कायद्यातून सुटून जाऊ असा आत्मविश्वास होता, त्यामुळेच त्याने हे कृत्य करायला धाडस केले. त्याने त्या चिमुकलीला जिवंत राहण्याचा कोणताही पर्याय दिला नव्हता. या घटनेमुळे समाजमनावर अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. शेवटी, आरोपीने सुधारण्याची सर्व पातळी ओलांडली असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. तपास यंत्रणेने अवघ्या १६ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून आणि ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदवून या प्रकरणाचा जलदगतीने निपटारा केला, ज्याचे न्यायाधीशांनी विशेष कौतुक केले.






