पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील धक्कादायक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सध्या विशेष न्यायालयात अतिशय जलद गतीने सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध अवघ्या 28 दिवसांत आरोप निश्चित करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाला आता एक अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. सरकारी पक्षाकडून न्यायालयात पुराव्यांची साखळी भक्कमपणे मांडली जात आहे.

न्यायालयीन प्रक्रियेसाठी सरकारी वकिलांनी एकूण 82 साक्षीदारांची विस्तृत यादी सादर केली आहे. आतापर्यंत या खटल्यातील 30 हून अधिक महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान, ससून रुग्णालयातील शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली असून, त्यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.

मृत्यूपूर्वी पीडित बालिकेवर क्रूर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून स्पष्ट झाले आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी हे वैद्यकीय अहवाल अत्यंत महत्त्वाचे आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम दुवा ठरणार आहेत.

तांत्रिक पुराव्यांच्या जोडीला वैद्यकीय अहवाल या खटल्याची दिशा ठरवण्यात निर्णायक ठरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या खटल्याकडे लागून राहिले असून, पीडितेच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा पूर्ण ताकदीने प्रयत्नशील आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याचे दैनंदिन कामकाज सुरू आहे.







