न्हावरे: गेल्या अनेक दिवसांपासून न्हावरे परिसरातील कांडगेवस्ती आणि खंडागळेवस्ती येथे धुमाकूळ घालणारा बिबट्याचा बछडा अखेर जेरबंद झाला असून, भक्ष्याच्या शोधात असताना सुमारे दोन ते अडीच वर्षाचा बिबट्याचा बछडा कांडगेवस्ती येथील बाळासाहेब दादा जगदाळे यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात स्वतःहून अडकला. आज बुधवारी (ता.२५) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत या बछड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याच्या बछड्याचे कांडगेवस्ती आणि खंडागळेवस्ती परिसरात वारंवार दर्शन होत होते. रात्रीच्या वेळी तसेच दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना तो दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात काम करण्यासाठी जाणारे शेतकरी, महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती. दरम्यान, कांडगेवस्ती येथील बाळासाहेब दादा जगदाळे यांच्या घराशेजारी कोंबड्यांचे खुराडे असून, त्यामध्ये सुमारे १५ ते २० कोंबड्या पाळलेल्या आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याचा बछडा या खुराड्यात भक्ष मिळवण्यासाठी शिरला. मात्र, खुराड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने तो आतमध्येच अडकून पडला.
यावेळी बाहेर पडण्यासाठी बछड्याने केलेली धडपड आणि कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणावर आवाज यामुळे जगदाळे कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याचा बछडा अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शेजारील नागरिकांना याबाबत माहिती दिली. घटनेची बातमी परिसरात पसरताच पहाटेच्या सुमारास मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले.

त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळी दाखल होत आवश्यक ती कार्यवाही करून बिबट्याच्या बछड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना स्वतःहून खुराड्यात अडकल्याने त्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम किंवा विशेष प्रयत्न करण्याची वेळ आली नाही. बिबट्याचा बछडा जेरबंद झाल्याने कांडगेवस्ती आणि खंडागळेवस्ती परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास टाकला आहे.






