बारामती : शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात किती मोठी वाढ होऊ शकते, याचे उदाहरण बारामतीतील गोविंद बागेत पाहायला मिळाले आहे. येथे एआयच्या मदतीने करण्यात आलेल्या ऊस शेतीत यंदा एकरी सरासरी 120 टन उत्पादन मिळाले आहे. गेल्या 15 वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी तब्बल 60 टनांची वाढ झाल्याने या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.

बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रयोग राबवण्यात आला. विशेष म्हणजे, यंदा कमी पाऊस झालेला असतानाही या तंत्रज्ञानामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले. यापूर्वी अनेक शेतकरी एकरी 60 ते 70 टन ऊस उत्पादन घेत होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदा हे प्रमाण 120 टनांपर्यंत पोहोचले.
या प्रयोगाची पाहणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंद बागेत केली. सकाळी 9 वाजता त्यांनी ऊसाच्या शेतात जाऊन लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियेची माहिती घेतली. उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी संभाव्य वाढ आणि खर्चात झालेली बचत याचीही माहिती त्यांना देण्यात आली.

या शेती प्रयोगात सेन्सर, हवामान केंद्रे आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. जमिनीतील ओलावा, पोषक घटक आणि हवामानातील बदल यांची माहिती नियमितपणे मिळते. त्यानुसार पाणी आणि खतांचे प्रमाण ठरवले जाते. मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना सिंचन, खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणाबाबत सूचना दिल्या जातात.
गरजेनुसारच पाणी व खतांचा वापर होत असल्याने अपव्यय कमी होतो. त्यामुळे उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. बारामतीतील हा प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक नियोजनबद्ध करण्याची दिशा दाखवत आहे.






