बारामतीत : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शरद पवारांवर विविध क्षेत्रातून अनेक दिग्गज नेते, उद्योगपती अशी सगळी मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. यामध्ये सामान्य कार्यकर्ते सुद्धा मागे राहिलेले नाही. बारामतीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना चांगलाच चिमटा काढला आहे. या बॅनरबाजीची सद्या जोरात चर्चा सुरु आहे.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत बॅनरबाजी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या बॅनरवर “मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही” अशा आशयाचा मजकूर छापण्यात आला आहार. या बॅनरच्या माध्यमातून शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.
मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने..
अजित पवारांनी अनेक आमदारांसह बंडखोरी करत राष्ट्रवादीवर दावा सांगितला होता. या दाव्यानंतर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह बहाल करण्यात आलं होतं. तर शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह देण्यात आलं होते. या पक्ष आणि चिन्हावर दोन्ही नेत्यांकडून निवडणूक देखील लढवली होती. त्यामुळे विधानसभेत अजित पवारांनी 41 जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवारांना अवघ्या 10 जागाच जिंकता आल्या होत्या. त्यामुळेच बॅनरवर “मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्व कमी होत नाही” असा मजकूर लिहत अजित पवारांना डिवचण्यात आले आहे.
दरम्यान, आज शरद पवारांचा वाढदिवस असल्या कारणाने अजित पवार यांनी त्यांना एक्सवरून शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार आणि त्यांच्या आमदार-खासदारांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मी कुटुंबातील सदस्य : अजित पवार
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, आज शरद पवारांचा वाढदिवस आहे, उद्या प्रतिभा काकींचा वाढदिवस आहे. आजचं दोघांना भेटलो, त्यांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला. असे अजित पवारांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, शरद पवारांसोबत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. परभणीमधील हिंसाचाराच्या घटनेची त्यांनी माहिती घेतली. त्याशिवाय संसदेचे हिवाळी अधिवेशन आणि राज्यातील इतर राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाली असल्याचेही अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले. मी कुटुंबातील सदस्य आहे, मी बाहेरचा कोणीच नाही, असेही अजित पवारांनी सांगितले. आजची भेट ही कौटुंबिक असल्याचा निर्वाळाही अजित पायावर यांनी दिला.