सागर जगदाळे

भिगवण: भिगवण परिसरातील गावागावांत गणरायाचे मंगलमय आगमन झाले आहे. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण, फुलांची आरास, विद्युत रोषणाई आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गावांचे वातावरण भक्तिमय झाले आहे. घराघरांत श्रद्धेचा दीप तेवत आहे आणि मंडळांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.

मात्र या उत्साहाच्या झगमगाटापलीकडे एक वेगळे वास्तवही शांतपणे उभे आहे. गणरायाच्या स्वागतासाठी आकाशाकडे रंगीबेरंगी रोषणाई झेपावत असताना, शेतकरीराजाची नजर मात्र अजूनही काळवंडलेल्या आभाळात पावसाच्या दोन सरी शोधत आहे. शिवार तहानलेले आहे, पिकांची चिंता कायम आहे आणि ग्रामीण अर्थचक्रावर त्याचे पडसाद उमटत आहेत. बाजारपेठेतील काहीशी शांतता या परिस्थितीचे मूक चित्रण करून जात आहे.

तेव्हा एक गणपती होता, पण संपूर्ण गाव त्याच्यासोबत होते…
काही वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव आठवला, तर चित्र वेगळे दिसते. ‘एक गाव–एक गणपती’ ही केवळ उत्सवाची संकल्पना नव्हती; ती गावाच्या एकजुटीची ओळख होती. एका गणपतीसमोर गावातील सर्व भेद विरघळायचे. कोणाच्या घरातून फुले यायची, कोणाचा हात सजावटीसाठी पुढे यायचा, कोणाची सेवा प्रसादासाठी असायची, तर कोणीतरी कार्यक्रमासाठी धावपळ करायचा.
गणपती एकच; पण त्याच्यामागे उभे असलेले हात असंख्य. मूर्ती एक होती, पण श्रद्धा सामूहिक होती. मंडप एक होता, पण मने अनेक नव्हती एकच होती.
आता चौकाचौकात गणपती; मंडळांची संख्या वाढली
काळ बदलला. गणेशोत्सवाचे स्वरूपही बदलले. आता चौकाचौकात, गल्लीगल्लीत स्वतंत्र गणेश मंडळे उभी राहत आहेत. काही गावांमध्ये दहा ते पंधरा मंडळे निर्माण झाल्याचे चित्र दिसते. मंडळांची वाढ ही तरुणाईच्या उत्साहाचे आणि सहभागाचे प्रतीकही मानता येईल. मात्र या वाढीसोबत वर्गणी, खर्च, प्रतिष्ठा आणि परस्पर स्पर्धेचे प्रश्नही पुढे येत आहेत. त्यामुळे प्रश्न मंडळे किती, हा नसून या मंडळांमधून गाव किती जोडले जाते, हा आहे.
‘आपले मंडळ मोठे’ की ‘आपला गाव मोठा’?
गणरायाच्या नावाने एकत्र आलेली तरुणाई ही गावाची मोठी ताकद आहे. मात्र काही ठिकाणी एकमेकांना वरचढ ठरवण्याची ‘खुन्नस’ मंडळांमध्ये निर्माण होत असल्याची चर्चा आहे. कोणाचा मंडप मोठा, सजावट अधिक आकर्षक, रोषणाई अधिक झगमगती, कार्यक्रम अधिक भव्य आणि गर्दी अधिक या गोष्टींमध्ये नकळत चढाओढ निर्माण होत आहे. उत्साह असावा, स्पर्धाही असावी; पण ती गावाच्या विकासाची असावी, समाजोपयोगी कामांची असावी, गरजूंच्या मदतीची असावी. गणरायाच्या नावावर उभारलेला उत्सव जर प्रतिष्ठेच्या मोजपट्टीवर मोजला जाऊ लागला, तर उत्सवाचा आत्मा कुठेतरी मागे पडण्याची शक्यता आहे.
एकाच दिवशी चार-चार पंगती; प्रश्न खर्चाचा नव्हे, प्राधान्याचा
गणेशोत्सवाच्या काळात काही ठिकाणी एकाच दिवशी वेगवेगळ्या मंडळांकडून चार-चार जेवणाच्या पंगती आयोजित केल्या जात असल्याचे चित्र आहे. अन्नदान ही निश्चितच चांगली भावना; मात्र एकाच गावात वारंवार होणाऱ्या अशा आयोजनांचा एकत्रित खर्च समाजोपयोगी कामांकडे वळवता येईल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण आज प्रश्न अन्नदानाचा विरोध करण्याचा नाही; प्रश्न उपलब्ध साधनांचा अधिक व्यापक समाजहितासाठी उपयोग करण्याचा आहे.
वर्गणीची वही वाढतेय; पण खिशाची क्षमता?
पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी, मंदावलेल्या व्यवहारांकडे पाहणारा व्यापारी आणि रोजच्या गरजा भागवताना तारेवरची कसरत करणारा सामान्य नागरिक या सगळ्यांच्या परिस्थितीचा विचारही गणेशोत्सवाच्या उत्साहात व्हायला हवा. एका मंडळाची वर्गणी देताना आनंद असतो; मात्र चौकाचौकात मंडळांची संख्या वाढली आणि प्रत्येक ठिकाणी वर्गणीची अपेक्षा निर्माण झाली, तर एकाच नागरिकाच्या खिशातून अनेकदा उत्सवाचा खर्च उचलला जातो. अनेक मंडळांच्या वर्गणीचा हा अतिरिक्त आर्थिक ताण शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर पडत असल्याची चर्चा आहे. गणरायाच्या उत्सवासाठी श्रद्धेने दिलेली वर्गणी ही आनंदाची बाब असावी; मात्र आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबासाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी तीच बाब ओझे ठरू नये, याची संवेदनशीलता मंडळांनीही जपण्याची गरज आहे.
गणेशोत्सव बदलला; आता त्याला दिशा कोण देणार?
गणेशोत्सवाचा विस्तार झाला, मंडळांची संख्या वाढली, उत्सवाची भव्यता वाढली; पण त्याच वेळी सामूहिकतेची व्याप्ती वाढली का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. तरुणाईकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि संघटनशक्ती आहे. हीच ताकद रक्तदान, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना मदत, पर्यावरण संवर्धन किंवा गावातील एखाद्या कायमस्वरूपी समस्येच्या निराकरणासाठी वापरली, तर गणेशोत्सवाची खरी उंची मंडपाच्या उंचीपेक्षा कितीतरी मोठी होऊ शकते.
गणपतीच्या मूर्ती वाढल्या म्हणून भक्ती वाढली असेही नाही आणि मंडळे वाढली म्हणून सामाजिक कार्य वाढले असेही नाही. भक्तीचे मोजमाप दिव्यांच्या संख्येने किंवा मंडपाच्या भव्यतेने नव्हे, तर माणसाच्या दुःखाशी जोडलेल्या संवेदनशीलतेने व्हायला हवे.
आज गणरायाच्या चरणी फुलांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे शेतकरीराजाच्या शिवाराला पावसाच्या थेंबाची आस आहे. बाजारपेठेला व्यवहारांचे चैतन्य हवे आहे आणि सामान्य नागरिकाला वाढत्या खर्चातून थोडा दिलासा हवा आहे. म्हणून यंदाच्या उत्सवाने एक प्रश्न मनात रुजवावा गणपती अनेक झाले, पण आपण एकत्र आहोत का?
गणरायाच्या आगमनाने गावातील प्रत्येक घरात आनंद नांदावा, शेतकरीराजाच्या तहानलेल्या मातीत पावसाच्या सरी बरसाव्यात, व्यापाऱ्याच्या व्यवहाराला उभारी मिळावी आणि सामान्य नागरिकाच्या जीवनातील चिंता हलक्या व्हाव्यात. मंडळे वेगळी असली तरी मने दुरावू नयेत; उत्सवाची वाट वेगळी असली तरी गावाच्या एकजुटीची दिशा एकच असावी. भक्तीच्या या मंगलपर्वातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि माणुसकी अधिक दृढ व्हावी हीच शेतकरीराजासह सर्वसामान्यांच्या मनातील भावना आहे.







