अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : अवैधपणे वाळूचे उत्खनन व वाहतुकीवर बंदी असतानाही महसूल विभागाच्या नाकावर टिचून भिमानदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे शासकीय गौणखनिज चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) व (ता. दौंड)येथे सोमवारी (ता. २१) रोजी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आला आहे. वाळूमाफिया टोळ्यांकडून नद्यांची लचकेतोड सुरू असून महसूलच्या मेहेरबानीने खुलेआम वाळू चोरी सुरू आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरु आहे. याबाबत महसूल विभागाच्या मंडल अधिकारी कार्यालयाला थांगपत्ता लागत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.
शिवतक्रार म्हाळुंगी येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. बाळूमाफियांनी रात्री अंधाराचा फायदा घेऊन व आज तर चक्क दिवसा ढवळ्या भिमा नदी पात्रातून लेबरच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेकायदा वाळूचे उत्खनन केले जात असून.
शासनाकडून कुठलीही परवानगी दिलेली नसताना बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. मात्र, महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियांवर अद्याप कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या वाळूमाफियावरती महसूल विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवतक्रार म्हाळुंगी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, भिमा नदीवर या भागातील शेतीला होणारा पाणी पुरवठा व पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत, मागील काही दिवसांपासून या नदी पात्रात वाळू माफिया टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. नदीवर खुलेआम बिनदिक्कतपणे लचकेतोड सुरू असून. यामुळे आसपासच्या शेत जमिनीच्या क्षेत्रांना धोका निर्माण झाला आहे.
रात्री उशिरा दहानंतर ते पहाटे पाच वाजेपर्यंत लेबरच्या सहाय्याने वाळू वाहतूक उपसा केला जातो. पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने या भागातील पर्यावरण प्रेमींनी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर करण्याची मागणी केली आहे. शिरूर व दौंड महसूल विभागाशी संपर्क साधला असता शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दौंड तालुक्याचे तहसीलदार शेलार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की चौकशी करून कारवाई करण्यात येईल.