योगेश शेंडगे
शिक्रापूर,(पुणे) : कंत्राटदाराने 35 कामगारांना खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना सरदवाडी (ता. शिरूर, जि.पुणे) येथे उघडकीस आली आहे. पोलिसांची हेल्पलाईन “डायल 112” च्या सुविधेमुळे कामगारांची सुटका करण्यास रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. तर याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
सुनिल दिगंबर वाघळकर (वय 30 वर्षे, रा. सदरवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), भारत गजानन मोहे (वय 25, रा. बोरगाव मंजू, ता. जि. अकोला, सध्या रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) आणि स्वप्निल दादाभाऊ लगड( वय-32 ,रा. ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मिलिंद गुलाबराव लांडगे (वय-29, मुळ रा. सिडको, आंबेडकरनगर, जळगाव रोड, छ. संभाजीनगर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार नोकरीच्या शोधात येतात. अशाच काही कामगारांच्या बेरोजगारीचा फायदा घेवुन काही कंत्राटदार त्यांच्याकडुन विनामोबदला, मारहाण, दमदाटी करुन काम करुन घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलीस अंमलदार संतोष ढगे हे डायल 112 या हेल्पलाईन नंबरवर 6 एप्रिल रोजी कर्तव्य बजावीत होते. यावेळी एका कॉलरने फोन करुन सांगितले की, आम्हा कामगारांना कंत्राटदाराने कोंडून ठेवून, मारहाण केली आहे. आम्हाला पोलीस मदत पाहिजे. ढगे यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महादेव वाघमोडे यांनी एक पथक घटनास्थळी पाठवले. सदर ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या खोलीमध्ये कोंडून ठेवलेल्या तब्बल ३५ कामगारांची सुटका केली.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी सुनिल वाघळकर, भारत मोहे व स्वप्निल लगड यांना तत्काळ अटक केली असून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने आरोपींना शुक्रवार (ता.१२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करीत आहेत.
कामगाराची सुटका करून दिले नातेवाईकांच्या ताब्यात
35 कामगारांना कोंडून ठेवुन त्यांच्याकडुन जबरदस्तीने काम करुन घेत पैसै न देता मारहाण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या कामगारांपैकी एक कामगार गोपाळ त्रिंबक शिंदे (वय 25 रा. बोरफळ, ता. औसा, जि. लातुर) हा मिसिंग असल्याबाबत त्याच्या मुळगावी तक्रार दाखल आहे. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून गोपाळ शिंदे याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
वाघळकर याने कंपनीतील कंत्राटदार स्वप्निल लगड आणि त्याच्या साथीदारांनी काम सोडून पळून चाललेल्या कामगारांना जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसविले. सर्व कामगारांना एका निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी कंबरेचा बेल्ट काढून बेल्ट तुटेपर्यंत कामगारांना पाठीवर, डोक्यात, हातावर मारहाण केली. तसेच कामगारांच्या छातीवर, तोंडावर लाथाबुक्यांनी मारहाण केली. हा फक्त ट्रेलर आहे फिक्चर अभी बाकी आहे, असं म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
मिलिंद लांडगे, कामगार
कोणत्याही कामगारांकडुन जबरदस्तीने, विनामोबदला कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर काम करून घेत असल्यास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला निर्भयपणे संपर्क साधावा, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची गई न करता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक