पुणे: देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत इंधनाच्या दरांमध्ये तब्बल ४ वेळा वाढ करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या चौथ्या दरवाढीमध्ये पेट्रोल २.६१ रुपयांनी, तर डिझेल २.१७ रुपयांनी महागले आहे. या सलगच्या दरवाढीमुळे गेल्या १० दिवसांत पेट्रोल एकूण ७.३८ रुपयांनी आणि डिझेल ७.०९ रुपयांनी महाग झाले आहे.

जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. या वाढत्या किमतींमुळे भारतातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. देशातील ५ राज्यांच्या निवडणुका पार पडताच कंपन्यांनी हा तोटा भरून काढण्यासाठी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. जनतेमधून एकदम तीव्र संताप व्यक्त होऊ नये, म्हणून कंपन्यांनी एकाच वेळी मोठी वाढ न करता टप्प्याटप्प्याने दर वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन आणि खाद्यतेलाची बचत करण्याचे आवाहन केले होते, त्याचीच प्रचिती आता येत आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील नवीन दर:
-
मुंबई: पेट्रोल १११.१२ रुपये (२.७३ रुपयांची वाढ) आणि डिझेल ९७.६८ रुपये (२.८१ रुपयांची वाढ).
-
ठाणे: पेट्रोल १११.२७ रुपये आणि डिझेल ९७.९२ रुपये.
या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून, पर्यायाने सर्वसामान्य ग्राहकांना महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत.







