पुणे: पुण्यातील बुधवार पेठ भागात पोलीस प्रशासनाने रविवारी रात्री एक मोठी कारवाई केली आहे. शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम (कोंबिंग ऑपरेशन) राबवली जात आहे. या अंतर्गत बुधवार पेठेतील ‘सागर बिल्डिंग’वर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ६ बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले आहे. या सर्व तरुणी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात बेकायदेशीरपणे राहत होत्या.

फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळ यांना सागर बिल्डिंग इमारतीत बेकायदेशीरपणे परदेशी महिला राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्रीच्या वेळी इमारतीला वेढा घालून ही छापेमारी केली.

पोलिसांनी अटक केलेल्या तरुणींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या महिलांना सुरुवातीला घरकाम, ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी चुकीच्या मार्गाने भारतीय सीमेत प्रवेश केला. मात्र, पुण्यात आणल्यानंतर त्यांना बुधवार पेठ भागात वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. तपासादरम्यान या महिलांनी स्वतःच्या संमतीने हा व्यवसाय स्वीकारल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलिसांनी गेल्या ११ महिन्यांत शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून तब्बल १०३ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक करून सर्व घुसखोरांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. आता अटक केलेल्या ६ तरुणींना भारतात आणणारे एजंट कोण आहेत आणि त्यांनी बनावट कागदपत्रे कशी बनवली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.







