पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे भीमा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या एका व्यक्तीला अग्निशमन दल आणि आपदा मित्रांच्या पथकाने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बचाव पथकाच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला.

महादेव उर्फ बाळू किसन राऊत (वय ४५, रा. वढू बुद्रुक) हे सोमवारी दुपारच्या सुमारास भीमा नदीकाठी सणसवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास भीमा नदीला अचानक पूर आल्याने पाण्याने परिसर वेढला आणि महादेव राऊत पाण्यात अडकले.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांसह महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि आपदा मित्रांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. दरम्यान, महादेव राऊत हे पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाने ड्रोनचाही वापर केला.
ड्रोनच्या मदतीने नदीलगतच्या शेत परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी झाडाझुडपांजवळ महादेव राऊत दिसून आले. त्यानंतर अग्निशमन दलाने शिताफीने त्यांच्यापर्यंत पोहोचत त्यांना सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी, आपदा मित्र तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांनी पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.
बचाव मोहिमेदरम्यान काही बचावकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता जीवनरक्षक जाकीट घालून पुराच्या पाण्यात उतरून प्रयत्न केले. त्यांच्या धाडसाचेही परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.






