पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच आता मावळचे राजकारण तापले आहे. मावळमध्ये सुनील शेळके आणि बापू भेगडे यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीची लढत होणार आहे. आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता कार्यकर्त्यांमध्येही टोकाचा संघर्ष बघायला मिळत आहे. प्रचारावेळी शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते भिडल्याचं समोर आले आहे. लोणावळ्यात दोन गटामध्ये हा संघर्ष झाला आहे. यावेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. आमदार सुनील शेळके लोणावळयात प्रचार करायला आले होते. त्यावेळी लोणावळयातील राम मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळकेंनी भेगडेंवर आरोप केले, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंदिरातून निघून जाण्याचा इशारा दिला.
शेळके आणि भेगडे यांचे शेकडो कार्यकर्ते जमल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकारही घडल्याचे समोर आले. दोन्ही गटाकडून आरोपप्रत्यारोप केला. पोलिसांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी लोणावळ्यातील वातावरण तापले होते. बापू भेगडे यांच्याकडून मावळ तालुक्यातील जनतेला दहशत निर्माण केली जात आहे. जनतेबरोबर आता माझ्यावर देखील दहशत निर्माण करण्यात येत आहे. विरोधकांना कोणता मुद्दा नसल्याने दहशत निर्माण करून रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केला आहे. बापू भेगडे यांनीही शेळके यांना प्रत्युत्तर दिले आहे.