राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा महत्वाचे विषय असलेले भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या गोंधळात संपन्न झाली. भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी एक वाजता पाटस येथे कारखाना स्थळावर सुरुवात झाली. कार्यकारी संचालक तुषार पवार यांनी यादी वाचून दाखवली याला सभेच्या प्रथेप्रमाणे आबाजी मतदानाने विषय मंजूर करण्यात आले, कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे व तात्या ताम्हाणे यांनी इतिवृत्त वाचून दाखवण्याची मागणी केली.
यावर प्रचंड गदारोळ निर्माण झाला, यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी २७ कोटी रुपयांची साखर दाखवावी अशी मागणी केली, तर वैशाली नागवडे यांनी अनेक वर्षापासून कुल – थोरात यामध्ये सभासदांचे प्रश्न तसेच राहून जात असून कारखान्याबाबत झालेल्या कराराच्या प्रती सभासदांना कशा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी वसंत साळुंखे, दीपक दिवेकर, बापू भागवत यांसह इतर तीन चार सभासद व्यतिरिक्त इतर कोणत्याही सभासदांना प्रश्न विचारता आले नाहीत. यामुळे ही सभा सभासदांची सभा होती की विधानसभेची पूर्वतयारी असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असल्याने सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. विरोधक काय प्रश्न विचारतील व त्या प्रश्नांना राहुल कुल कशी उत्तरे देतात. यासभेला माजी आमदार रमेश थोरात हे उपस्थित राहणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून तालुक्यात चालू असल्याने यामुळे सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
थोरात यांनी कारखाना निराणी ग्रुप का साई प्रिया यांना चालवण्यासाठी दिला याबाबत प्रश्न उपस्थित केला, वैशाली नागवडे यांनी गेल्या सर्वसाधारण सभेला निराणी ग्रुपचे नाव साखर कारखान्याला देण्यात आले होते. ते आता दिसत नाही असा प्रश्न उपस्थित केला, तात्या ताम्हाणे यांनी बोलू न दिल्याने माइक फेकून दिला व इतिवृत्त वाचून दाखवण्याची मागणी केली.
नामदेव ताकवणे यांनी कारखान्याकडे १२५ कोटी शिल्लक असताना १५० कोटी रुपयांना २५ वर्षांसाठी कारखाना चालवायला का दिला, असा प्रश्न उपस्थित केला. तर राजाभाऊ तांबे यांनी चेअरमन यांनी १५ कोटी रुपयाचा बंगला कसा बांधला असे प्रश्न उपस्थित केल्याने अनेक वेळा सभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार राहुल कुल यांनी शांततेत उत्तरे देत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची पूर्ण रक्कम निराणी ग्रुप यांनी परतफेड केली असल्याने त्यांनी सदर साखरेची विक्री केली असल्याचे सांगितले.
याबाबत संपूर्ण माहिती बँकेकडे आहे, घराबाबत प्रश्न विचारलेले आपल्या संपूर्ण कुटुंबाचा इतिहास आमदार राहुल कुल यांनी सांगितला. तालुक्यात कोणी कोणी घरे बांधली, मालमत्ता कमावली याची चौकशीसाठी मागणी करा मी आपल्याबरोबर असल्याचे सांगितले. कारखान्याबाबत करार बाबतची माहिती पुणे जिल्हा बँकेकडे असून ही माहिती बँकेकडे नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.
तर बापू भागवत यांनी पाणी प्रश्नासाठी काय उपाययोजना राबवल्या याबाबत प्रश्न विचारला असता विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. कारखान्याच्या सभेमध्ये फक्त कारखान्याबाबतच प्रश्न विचारावे अशी विरोधकांनी मागणी केली. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या, अखेर गोंधळातच सभेची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.