विशाल शिंदे

भोर, दि. ८ जून : भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथे किरकोळ वाद मिटविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरासमोर जमाव जमवून शिवीगाळ, दहशत निर्माण करणे आणि वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ नामदेव शिंदे (वय ६०, रा. शिंदेवाडी, ता. भोर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ६ जून रोजी सायंकाळी त्यांच्या भाडेकरू संजय पाटील आणि बाबू बजरंग बालवडकर यांच्यात वाहन घासल्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी शिंदे गेले होते.
मात्र, त्याच रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास बाबू बजरंग बालवडकर (रा. गोगलवाडी, ता. हवेली) व त्याचे अन्य सात ते आठ साथीदार शिंदे यांच्या घरासमोर आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत शिवीगाळ केली. तसेच “ये म्हाताऱ्या, खाली ये” अशी धमकी देत परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
यावेळी आरोपींनी दगड व विटांच्या सहाय्याने शिंदे यांच्या कारच्या चालक बाजूच्या तीन काचा तसेच मागील काच फोडली. या प्रकारात सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच आरोपींनी हातातील कोयता दाखवत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मुंढे करत आहेत.
या घटनेमुळे शिंदेवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.







