लोणावळा: पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि बिभत्स पार्ट्यांचा प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे. लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्री एका बंगल्यावर धाड टाकून 16 तरुण-तरुणींना मद्यधुंद अवस्थेत रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भांगरवाडी परिसरातील ‘पुराणिक सोसायटी’मधील 135 क्रमांकाच्या बंगल्यातून मोठ्या आवाजात संगीत आणि आरडाओरड येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गस्त घालत असलेल्या पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाने तत्काळ या बंगल्यात प्रवेश केला.

जेव्हा पोलिसांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला, तेव्हा तिथे सुरू असलेला प्रकार पाहून अधिकारीही अवाक झाले. तिथे ९ तरुण आणि ७ तरुणी मोठ्या आवाजात गाणी लावून मद्यपान करत होते आणि अश्लील कृत्य करत धिंगाणा घालत होते.
या प्रकरणी पोलिसांनी केवळ १६ पर्यटकांवरच नव्हे, तर ही बेकायदेशीर पार्टी आयोजित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा बंगल्याचा मालक आणि तिथला केअरटेकर अशा एकूण १८ जणांविरुद्ध लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.







