शिक्रापूर, (पुणे) : पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथील पाबळ फाट्याजवळ अपघाताची घटना घडली आहे. अहमदनगर बाजूने भरधाव आलेल्या टेम्पोने दुभाजकावर आदळून तीन पादचाऱ्यांना चिरडले. या घटनेत गणेश सदाशिवराव शित्रे (वय ४८) आणि परिक्षित गणेश शित्रे (वय ९, दोघे रा. शिक्रापूर) बापलेक जखमी झाले आहेत, तर गीता गणेश शित्रे ही अकरा वर्षाची मुलगी जागीच ठार झाली.
याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात कैलास हिरामण औसरमोल (वय ४५ वर्षे, रा. यश इन चौक कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) या टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-नगर महामार्गावर अहमदनगरच्या बाजूने (एम एच १६ एई ९५१७) हा टेम्पो भरधाव भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने आला. यावेळी पाबळ चौकात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर टेम्पो धडकून टेम्पोने तिघा पादचाऱ्यांना चिरडत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ओढत नेले. यात तिघेजण चिरडले जाऊन एक मुलगी टेम्पोच्या चाकाखाली अडकली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून एक अकरा वर्षाच्या मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस हवालदार शंकर साळुंके, अविनाश पठारे, विकास मोरे, नारायण सानप यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचालकाला ताब्यात घेऊन सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत नागनाथ राजेंद्र गव्हाणे (वय ४१ रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बापू हाडगळे करत आहेत.