अक्षय भोरडे
तळेगाव ढमढेरे(पुणे) : शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील राहु ते शिवतक्रार म्हांळुगी फाटा रस्त्यावर कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारा टेम्पो उलटला. १६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास टेम्पो मधून कत्तलीसाठी गोवंश घेऊन जात होता. टेम्पोच्या पाठीमागून येणारे गोरक्षक अहिरेश्वर जगताप, विकास शेंडगे, संदीप शिंदे, आरिफ शेख यांनी टेम्पो चालकाला थांबण्याचा इशारा केला.
मात्र, टेम्पो चालक गोराक्षकांपासून बचाव करण्यासाठी पुन्हा रस्त्याने पाठीमागे वळून निघून जात असताना रस्त्याच्या ओढ्यावर असलेल्या पुलावरून टेम्पो खाली कोसळला. दरम्यान टेम्पो चालक ओंकार सायकर आणि त्याचा मित्र तेथून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शंकर साळुंके, किशोर तेलंग, पोलीस शिपाई नीरज पिसाळ, निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोमधील तीन गोवंशांना गोरक्षकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
याबाबत पोलीस शिपाई नीरज तानाजी पिसाळ (वय ३५ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून गोवंशांची वाहतूक करणाऱ्या ओंकार दशरथ सायकर (रा. राहू ता. दौंड जि. पुणे) यांच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, टेम्पो मधील तीन गोवांशांची पांजरपोळ मध्ये रवानगी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहेत .