दीपक खिलारे
इंदापूर : तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील हिंदू स्मशानभूमीच्या परिसरात काटेरी झाडे-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच याठिकाणी ग्रामपंचायतीकडून मूलभूत सोई-सुविधा पुरविण्यास दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तरंगवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने लाखो रुपये खर्चून स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून याठिकाणी पेव्हर ब्लाॅक, हायमास्ट दिवा देखील बसविण्यात आला आहे. परंतु आवारात वाढलेल्या काटेरी झाडा-झुडपांमुळे व याठिकाणचा दिवा बंद असल्याने रात्री-अपरात्री अंत्यसंस्कारासाठी येणार्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ हा परिसर स्वच्छ करुन, याठिकाणचा हायमास्ट दिवा चालू करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तरंगवाडी ग्रामपंचायतीकडून गावामध्ये दलित वस्ती, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी व चौकांमध्ये हायमास्ट दिवे बसविण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालाजवळ बसविलेला हायमास्ट दिवा वर्षेभरापासून बंद आहे, दलित वस्ती मधीलही दिवा बंद अवस्थेत आहे.
तसेच नूतन सरपंच यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकामध्ये लावण्यात आलेले हायमास्ट दिवा गेली वर्षेभरापासून गायब झाला असून याठिकाणी केवळ सांगाडाच उभा असल्याचे दिसून येत आहे. यामुळे याठिकाणचा दिवा चोरीला गेला की, काय अशी चर्चा नागरिक करीत आहेत.