राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व सातारा-शिरूर राज्यमार्ग हे एकत्र येत असलेल्या केडगाव-चौफुला येथील मुख्य चौकातील हायमास्ट दिवे बंद होते. ‘चौफुला येथील मुख्य चौकातील बंद असलेले हायमास्ट दिवे चालू करण्याची मागणी’, या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली. या बातमीची तत्काळ दखल घेऊन महामार्ग प्रशासनाने अवघ्या १२ तासांच्या आत बंद असलेला हाय मास्ट दिवा सुरू केल्याने नागरिकांच्या वतीने ‘पुणे प्राईम न्यूज’चे अभिनंदन होत आहे.
चौफुला येथील मुख्य चौकातील हायमास्ट दिवा अनेक दिवसांपासून बंद होता. हा दिवा चालू करण्याची मागणी नागरिक करत होते. याबाबत २६ नोव्हेंबरच्या अंकात बातमी प्रसिद्ध झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तत्काळ बंद असलेला दिवा चालू केली. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल ‘पुणे प्राईम’चे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंखे व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सचिव ऋषिकेश बंदिष्टी यांनी, ‘पुणे प्राईम’ यांनी लावलेल्या बातमीची त्वरीत दखल घेऊन नागरिकांची समस्या सोडवली याबद्दल जागृत पत्रकाराचे व ‘पुणे प्राईम’ वृत्तपत्राचे नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले. अशाच समाजहिताच्या सार्वजनिक बातम्या प्रसिद्ध करून जनतेच्या अडचणी सोडवण्यास सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
केडगाव चौफुला चौकातील बंद असलेला हायमास्ट NHAI व PSEPL टोल कंपनीकडून त्वरित सुरू करण्यात आले, त्याबद्दल दोन्हीही प्रशासनाचे वसंत साळुंखे यांनी आभार मानले.